फकीरा अण्णाभाऊ साठे कादंबरी | Annabau Sathe Fakira Novel In Marathi Book/Pustak PDF Free Download
पुस्तक के कुछ मशीनी अंश
फकीरा
सूर्य मावळला होता. त्याचा किंचित प्रकाश पश्चिमेच्या किनारीवर राहून गेल्यामुळं एक गुलाबी धांदोटी पसरली गेली होती. त्याखाली लख्ख पोलादी रंग दिसत होता.
तिथं ती सूर्य बुडाल्याची खूण उमटली होती. बाकी अंधाराची चढाई सर्व जग, तो खोरा व्यापीत होती. वारणेपासून कृष्णेपर्यंतचा तो सलग सुपीक प्रदेश अंधकारमय होत होता.
सूर्यानं सर्व कलांनी जग जितकं लखलखीत केलं, तितकंच अंधार काळं करू लागला. प्रकाशामागं अंधार नि अंधारामागं प्रकाश हे चक्र गतिमान होत होतं.
वाटेगावचं अस्तित्व नाहीसं झालं. ती एका जागी बसलेली बाराशे घरं अंधाराच्या लाटांनी गडप केली. त्या गावाच्या आजूबाजूचे माळ, तो सात दरे असलेला सह्याद्रीचा प्रचंड डोंगर अंधारात बुडाला.
गावाच्या अस्तित्वाला अदमासाची गरज भासू लागली. तांबखडीवरून आलेली ती गाडीवाट गावात शिरली होती.
ती विष्णुपंत कुलकर्ण्याच्या भव्य वाड्यापुढून चावडीकडे वळून मग शंकरराव पाटलाच्या वाड्याला वळसा घालून महारांच्या थळात सरळ झाली होती.
तसंच पुढं जाऊन मांगवाड्याच्या जवळ असलेल्या प्रचंड चिंचेखाली गेलं, की मांगांच्या घराकडे वळावं लागत होतं. तेथून ती गाडीवाट उगवतीला जाऊन माळानं, पांदीनं नागमोडी वळणं घेत शिगावात शिरली होती.
वाटेगाव ते शिगाव हे चार मैलांचं अंतर त्या गाडीवाटेनं सहा मैलांची कैक वळणं घेऊन संपवलं होतं. ती वाट आज अंधारानं पुसून काढली होती.
हळूहळू पावसाळी वारं उठलं आणि भन्नाट धावत सुटलं. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. पाण्यात मासा पोहावा, तशी ढगात वीज सळसळू लागली.
विजेच्या प्रखर प्रकाशात आकाश कोसळण्याच्या बेतात आल्यासारखं दिसू लागलं. अक्राळविक्राळ आकृत्या करून ढग गिरक्या घेऊ लागले. वारा त्या ढगांना चेंडूप्रमाणे टेपलू लागला.
गावात सामसूम झाली. सर्व गल्ल्या निर्जन भासू लागल्या. मिणमिण जळणारे दिवे हळूहळू डोळे झाकू लागले. कुत्री मुकी झाली. सर्वत्र निःशब्दता नांदू लागली.
भित्रं वातावरण उदास होऊन उभं राहिलं. गाव हूं का चूं करीनासं झालं. शंकरराव पाटील एकटाच जोत्यावर बसला होता. कोणी तरी यावं आणि आपल्याशी बोलत बसावं, असं त्याला वाटत होतं;
पण किती तरी वेळ कोणीच येत नव्हतं, म्हणून तो चिडला होता. त्यानं आपले दोन्ही गुडघे पोटाशी आवळून धरले होते आणि स्वत:ला मंद झोके देत तो समोरच्या वाटेकडे टक लावून पाहत होता.
येणारा-जाणाराचा सासुंद घेण्यासाठी त्यानं आपले कान टवकारले होते, पण पाटलाशी बोलत बसायला कोणीही येत नव्हतं. दारं बंद करून लोक केव्हाच अंथरुणावर आडवे झाले होते.
त्याचीच पाटलाला चीड आली होती. जन्मभर कष्ट करून शेवटी मरायचं, हे त्याला पसंत नव्हतं. माणसानं कसं आनंदात असावं, खेळावं, बोलावं आणि राबावं, असं त्याचं मत होतं.
उद्याच आषाढ निघत होता. उद्या शिगावात जोगणीची जत्रा भरणार होती. शिगावच्या बाजीबा खोताचा त्याला हेवा वाटत होता.
लेखक | महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा |
भाषा | मराठी |
एकूण पृष्ठे | 216 |
Pdf साइज़ | 28 MB |
Category | कादंबरी(Novels) |
अण्णाभाऊ साठे कादंबरी – Annabau Sathe Novel In Marathi Book/Pustak PDF Free Download